घरदेश-विदेशद्रौपदी मुर्मू देशाच्या १५व्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू देशाच्या १५व्या राष्ट्रपती

Subscribe

यशवंत सिन्हा यांचा पराभव, २४ जुलैला घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला आहे. मुर्मू यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी झालेल्या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू यांना ८१२, तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली आहेत. या विजयामुळे राष्ट्रपतीपदावर विराजमान होणार्‍या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील.

द्रौपदी मुर्मू २४ जुलैला देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील, तर २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी समाप्त होणार आहे. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसर्‍या महिला राष्ट्रपती होण्याचा मानही मिळाला आहे. विशेष म्हणजे १५ वर्षांपूर्वी २१ जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रूपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. मुर्मू यांच्या विजयाची घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित होते.

- Advertisement -

राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह एकूण ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण लोकप्रतिनिधींपैकी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता, तर देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले होते.

द्रौपदी मुर्मू यांना ८१२, तर यशवंत सिन्हांना ५२१ मते
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना ५४० मते मिळाली. या मताचे मूल्य ३,७८,००० इतके होते, तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली. त्यांच्या मताचे मूल्य १,४५,६०० इतके होते. दुसर्‍या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना १३४९, तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली. सर्व राज्यांतील मतमोजणी झाल्यानंतर अखेर मुर्मू यांना ५ लाख ७७ हजार ७७७ मते मिळाली. शेवटच्या तिसर्‍या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना ८१२, तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली. या निवडणुकीत ५० टक्क्यांहून जास्त मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. त्यानुसार मुर्मू विजयी झाल्या आहेत.

- Advertisement -

काँग्रेस-राष्ट्रवादीचे १६ आमदार फुटले?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशभरातील एकूण १७, तर राज्यातील १६ आमदारही फुटल्याची माहिती समोर आली आहे. यात शिवसेनेच्या आमदारांनी आधीच मुर्मू यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला होता, मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -