घरमहाराष्ट्र१ जुलैला शाळेची घंटा वाजणार

१ जुलैला शाळेची घंटा वाजणार

Subscribe

मुंबई, ठाणे, पुण्यातील शाळा, महाविद्यालये बंदच

करोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील बंद ठेवण्यात आलेल्या शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने सोमवारी परवानगी दिली. त्यामुळे १ जुलै रोजी शाळेची घंटा वाजणार असून वर्गातील बाकांवर विद्यार्थी नवे धडे गिरवताना दिसतील. मात्र, रेडझोन असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे परिसरातील शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद राहणार आहेत.

करोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकेल. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात. दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली.

- Advertisement -

दरवर्षी राज्यात जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होते. करोनाच्या संकटामुळे शाळा सुरू होणार किंवा कसे? याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरू नाही झाल्या तरी शिक्षण सुरू झाले पाहिजे, या विधानाचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरू होत आहेत तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी, असेही ठाकरे यांनी सांगितले.

ग्राम करोना प्रतिबंधक समिती, शिक्षकांवर जबाबदारी
शाळा सुरू करण्यासाठी आता सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल. गावांमधील करोना प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल. शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदी कामे केली जातील. गटागटाने पालक सभा घेऊन पालकांच्या मनातली भीती कमी करण्यात येईल. बालरक्षक आणि शिक्षकांनी शाळाबाह्य होण्याची शक्यता असलेल्या तसेच स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळवायचे आहे. सरल प्रणाली अद्ययावत करणे आणि विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक भरणे, ग्राम पंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडिओ यांची व्यवस्था करण्यात यावी, जेणे करून कुठलीच सोय नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी मदत होईल. गुगल क्लास रूम, वेबिनार डिजिटल प्रायोगिक तत्वावर सुरु करणे, ई शैक्षणिक साहित्य निर्मिती, सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल अ‍ॅपचा उपयोग, शाळेच्या स्पिकरवरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देत राहणे आदी मुद्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली.

- Advertisement -

केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्र्यांशी बोलणार
यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्राधान्याने दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग करून घेण्याची विनंती केली. त्यानुसार माहिती आणि नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण यासंदर्भात लगेच बोलून ही माध्यमेदेखील उपलब्ध करून घेतली जातील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पहिली, दुसरीसाठी ऑनलाईन शिक्षण नाही
ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आला आहे. पहिली आणि दुसरीच्या मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय दिला जाणार नाही. तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज एक तास आणि पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शिक्षकांची करोना ड्युटी रद्द करावी, पंचनामे लवकर व्हावे, शाळा निर्जंतुकीकरण खर्च १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून द्यावा, परजिल्ह्यांतून शिक्षकांना इतर जिल्ह्यांत प्रवासासाठी परवानगी मिळावी, सादिल अनुदान लवकर मिळावे, वेतनेतर अनुदान मान्यता व निधी, सफाई कामगार हवेत, असे मुद्दे शिक्षण विभागाने आजच्या बैठकीत ठेवले. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय आदी उपस्थित होते.

कोकणातील वादळग्रस्त शाळांची प्राधान्याने दुरुस्ती
कोकणात चक्रीवादळाचा तडाखा बसून ज्या शाळांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कोकणातील शाळांसाठी २८ कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी शिक्षण विभागाने केली आहे.

=रेड झोन नसलेल्या भागातील शाळा सुरू करण्याचे नियोजन.
=जुलैपासून नववी, दहावी आणि बारावीची शाळा, महाविद्यालये सुरू होणार.
=सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून तर तिसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू होणार.
=पहिली आणि दुसरीचे वर्ग शाळा व्यवस्थापन समितीच्या आणि पालकांच्या मान्यतेने सुरू करणार.
=इयत्ता ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणार्‍या दहावीच्या निकालानंतर सुरू करण्याचे नियोजन.
=ज्या ठिकाणी शाळा सुरू होणार नाहीत तिथे टाटा स्काय, जिओच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरू.

वर्गात कमी मुले बसविणे, व्हॉट्अ‍ॅप ग्रुप्सवरून शिक्षकांनी मुलांच्या शंकांचे समाधान करणे, एक दिवसाआड शाळा, सम-विषम पर्याय अशा विविध पर्यायांचा विचार करून शिक्षण सुरू ठेवण्यात येईल.
– वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -